यादोंके झरोखोंसे - ३)


१९६९ साल संपताना आराधना सिनेमा प्रदर्शित झाला आणि त्यातील गाण्यांनी कहर केला किशोरकुमारचे मेरे सपनोकी रानी, रूप तेरा मस्ताना आणि कोरा कागज था ये मन मेरा यांनी हिंदी चित्रपटाच्या पार्श्वगायकाच्या स्थानात उलथापालथ झाली. आराधना मध्ये रफी ची दोन गाणी होती. पण या सिनेमानंतर रफी च्या साम्राज्याला धक्का बसला. तरी सुद्धा ७०-७१ पर्यन्त अनेक सिनेमामध्ये फक्त रफी ची गाणी होती ही. नंतर मात्र अनेक सिनेमामध्ये फक्त किशोर ची गाणी ऐकू येऊ लागली. जे संगीतकार, निर्माते आणि नट आग्रहाने रफ़ीचाच आवाज घेत होते त्यांना आता फक्त किशोर च हवा होता. रफीच्या आवाजाची जादू अचानक चालेनाशी कशी काय झाली?
१९४८ च्या जिद्दी ह्या सिनेमापासून किशोर चा प्रवास सुरु झाला होता. पण १९६९ पर्यंत तो कधीच संगीतकारांच्या पहिल्या पसंतीचा गायक नव्हता. अगदी सचिन देव बर्मन यांनी पण किशोरला खूप कमी वापरले होते. शंकर जयकिशन यांनी किशोर चा वापर हा तो हिरो असलेल्या सिनेमापुरता केलेला होता. तीच गोष्ट मदनमोहन, रोशन, रवी, कल्याणजी आनंदजी अशा अनेक संगीतकाराची. तो पर्यंत सर्वच संगीतकार प्रामुख्याने रफी ला वापरत होते.
रसिकांनी पण पूर्वी किशोर ची गाणी ऐकली होती आणि त्याची अनेक गाणी प्रसिद्ध ही होती. अचानक रसिकांची आवड कशी बदलली हे न उलगडलेले कोडे आहे. मी ९ वीत असताना आराधना सिनेमा आला तो पर्यन्त गाणी ऐकणे या पलीकडे कोणत्याही गायकाचा विचार मनात येत नसे. माझ्या ११ वी पासून कॉलेज जीवनापर्यन्त १९७६ पर्यन्त मात्र हिंदी चित्रपटात मात्र किशॊर छा गया था. त्यामुळे एका अर्थाने रफीचा सर्वोच्च काळ नक्कीच आम्ही ऐकला नाही. तरी सुद्धा आम्हा सर्व मित्रांना रफी च जास्त आवडत असे. अर्थात किशोर काय किंवा सर्वच गायक आणि त्याची विविध ढंगाची गाणी आवडत होतीच आणि अजूनही आहेत.
पुढे जसं गाणी ही विविध अंगांनी ऐकत गेलो आणि विविध संगीतकाराच्या सर्वच चित्रपटाचे संगीत त्यांनी वेगवेगळ्या गायकांचा केलेला उपयोग ही अधिक खोलवरपणे ऐकत गेलो तसतसे एकेक गोष्ट जास्त जाणवत गेली म्हणजे अचानक ह्या सर्व संगीतकारांना रफी नकोसा का झाला ? अर्थात नौशाद, ओ. पी नैयर, रवी, शंकर जयकिशन अशा संगीतकारांच्या बहारीचा काळ संपत आला होता आणि त्यांचे हिंदी चित्रपट सृष्टीतील स्थान खालावले होते. १९७१ पासून लक्ष्मीकांत प्यारेलाल, राहुल देव बर्मन आणि कल्याणजी आनंदजी ही आघाडीचे संगीतकार झाले होते.
१९७१ ला आलेल्या कारवा सिनेमा पर्यंत राहुल देव बर्मन याच्या संगीताचा ढाचा पूर्णपणे वेगळा होता तो पर्यंत त्याने रफीचा खूप वापर केला मात्र हरे राम हरे कृष्ण या सिनेमानंतर मात्र त्याचे संगीत खूप वेगळे झाले आणि त्याच्या संगीतात किशोर चा वापर वाढला आणि ही स्वाभाविक होते. त्याची संगीत कारकीर्द ऐकली की ही जाणवते की किशोर त्याच्या संगीतात जास्त योग्य होता. तसे राहुल देव बर्मनने वेळोवेळी रफी ला नंतरच्या काळात वापरले ही आहे
लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत वेगळ्या प्रकारचे होते. त्यांच्या दुश्मन ह्या १९७१ साली आलेल्या सिनेमापर्यंत मात्र त्यांच्या संगीतात रफी च जास्त योग्य होता मात्र नंतरच्या बदललेल्या संगीतात मात्र किशोर ला त्यांनी जास्त वाव दिला अर्थात आवश्यक त्या ठिकाणी मात्र ते आवर्जून रफी लाच वापरत होते मग ते लोफर सिनेमातील ' आज मौसम बडा बेईमान है ' हे गाणे असो किंवा सरगम या १९७९ साली आलेल्या सिनेमातील सर्व गाणी ही रफींच्याच आवाजात होती.
कल्याणजी आनंदजी यांनी रफीचा वापर पूर्वीपासून केला होता पण प्रामुख्याने त्याचा आवाजाचाच वापर केला आहे असे नव्हते. मुकेश चा वापर त्यांनी जास्त केला होता. मात्र १९७१ नंतर आलेल्या त्यांच्या सिनेमात मात्र किशोर त्यांनी प्रामुख्याने वापरला.
शंकर जयकिशन यांनी पण त्यांच्या शेवटच्या काळात किशोर ला प्रामुख्याने वापरले. मदनमोहन मात्र रफी लाच जास्त वापरत होते.(परवाना, एक मुठ्ठी आसमान किंवा बावर्ची सारखा अपवाद वगळता) परवानात किशोर बरोबर रफी ला ही गाणे होते. त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळात हसते जख्म सिनेमात रफीला ' तुम जो मिल गये हो ' सारखे अप्रतिम गाणे दिले होते.
ह्या विषयावर खूप लिहिण्यासारखे आहे. खूप गाणी मनात येतात आणि वाटत राहते की खरंच हे असे का झाले ? किशोर काय रफी काय दोघेही ही उच्च दर्जाचे गायक आहेत यात शंकाच नाही. पण ....
आज इतक्या वर्षा नंतर पण हे कोडे उलगडत नाही.

No comments:

Post a Comment